आम्ही येवले मूळचे आस्करवाडीचे. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातलं हे आमचं छोटंसं गाव. दारात फक्त दोन म्हशी. त्यांच्या दुधावरच आमच्या वडिलांनी संपूर्ण कुटुंब चालवलं. मापात पाप नाही हे वडिलांचं धोरण. त्यांनी दुधात पाणी ओतलं ते फक्त चहा बनविण्यासाठीच. चहा बनविणं हा त्यांचा पुराना शौक. शिवाय चहाच्या दुकानात काम केल्याचा अनुभव गाठीशी होताच. याच बळावर आमच्या वडिलांनी एका पार्टनरच्या मदतीनं पुण्यातल्या एम.जी. रोडवर दुकान भाड्यानं घेऊन चहा विकायला सुरूवात केली. या व्यवसायचं मुख्य भांडवल होतं, आमच्याकडे शिल्लक राहिलेलं दूध ! पुढे याच व्यवसायाला उकळी फुटली आणि घरात आणखी ४ म्हशी आल्या.

पण खऱ्या अर्थाने ‘येवल्यांचा चहा’ सुरू झाला तो १९८३ साली. पुण्यातल्या सॅलिसबरी पार्कसारख्या भागात वर्षा अपार्टमेंटमध्ये आम्ही आमचं स्वतःचं दुकान घेतलं. त्यासाठी आईचे दागिने मोडावे लागले पण या ‘गणेश अमृततुल्य’ने आमचे पुणेकरांशी घट्ट नाते जोडले.

त्याकाळात या चहाची चव पुणेकरांच्या जिभेवर रेंगाळू लागली आणि बदलत्या काळाप्रमाणे चहासोबत खारी, बिस्किटं, नानकटाई, क्रिमरोल ही मंडळीही ‘अमृततुल्य’ झाली. चहाचा हा पहिला व्यवसाय प्रगतीच्या वाफेवर उकळत असतानाच २००१ साली आमचे वडिल श्री. दशरथ भैरू येवले यांचे निधन झाले. आधार गेला तरी वारसा जपायचा या भावनेतून आम्ही घरातले सदस्य या अमृततुल्यमध्ये कामासाठी उभे राहिलो. वडिलांची एक अखेरची इच्छा होती. ती म्हणजे आपल्या नावाने मार्केटमध्ये असे एखादे उत्पादन हवे की जे चिरंतन राहिल. ही इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य आमचे होते. एकदा अण्णांकडून कळाले की, सुरूवातीच्या काळात लोक ‘गणेश अमृततुल्य’मध्ये यायचे ते केवळ आमच्या चहाची चव घेण्यासाठी. काळाच्या ओघात आणि इतर खाद्यपदार्थांच्या नादात ही चव काळाच्या मागेच राहिली.

हे जेव्हां लक्षात आलं तेव्हां आम्ही ठरवलं की आता फक्त चहाच्या चवीकडेच लक्ष द्यायचं. आमच्या मोठे होण्यात ज्यांचा मोठा वाटा होता त्या आमच्या आचाऱ्यांच्या हातात आम्ही ‘गणेश अमृततुल्य’ सोपवलं आणि आम्ही बाहेर पडलो ते संशोधनासाठी ! अनेक प्रयोगानंतर अखेर ती ‘अमृततुल्य चव’ आम्हांला गवसली आणि हीच चव सगळीकडे कायम ठेवायची हा निर्धार करूनच आम्ही या व्यवसायात उतरलो. ते साल होते, २०१७. पुण्यातल्या भारती विद्यापीठाच्या परिसरात मित्राचा भेळीचा स्टॉल आम्ही निवडला आणि पुण्यात शुभारंभ झाला, ‘येवले चहा’चा !

दर्जेदार चहासोबतच स्वच्छता, आपुलकीचे नाते आणि विनम्र सेवा आम्ही द्यायला सुरूवात केली. पुणेकरांना हा ‘येवले चहा’ आवडू लागला आणि पाहता पाहता पुण्याच्या विविध भागात ‘येवले चहा’ दिसू लागला आहे. येत्या ५ वर्षात पुणेकरांचा आवडता चहा कोणता हे म्हटल्यावर ‘येवले चहा’ हेच उत्तर येईल यासाठी आम्ही येवले कुटुंब प्रयत्नशील आहोत.

about-image